नवी मुंबई महापालिकेला राज्य शासनाकडून मिळाले १० अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स
नवी मुंबई: कोविड-१९ विरोधातील लढ्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासोबतच कोरोना बाधितांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नियंत्रणाखाली विशेष लक्ष देण्यात येत आहे. आरोग्य सुविधांमध्ये जाणवणारी व्हेंटिलेटरची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना महाराष्ट्र शासनाने संपूर्णपणे मदतीचा हात देत आय. व्ही. ऍडव्हान्स मोडच्या मॉनिटर सह सर्व सुविधा असणारे १० अत्याधुनिक वेंटिलेटर नवी मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत.
वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर येथील नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या कोविड केअर सेंटर व डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर कार्यान्वित करण्यापूर्वी अंतिम पाहणी प्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेस व्हेंटिलेटर पुरविण्यात येतील असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राधान्याने करत महानगरपालिकेस दहा अत्याधुनिक व्हेंटिलेटर उपलब्ध करून देत केली आहे. याबाबतच्या कार्यवाही मध्ये ठाणे जिल्हा आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉक्टर गौरी राठोड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे प्राप्त या दहा अत्याधुनिक व्हेंटिलेटर्समुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचे अधिक सक्षमीकरण झाले असून नवी मुंबईकर नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार असल्याचे म्हणत आयुक्त अभिजीत बांगर यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले.
