केंद्र व राज्य सरकारच्या RTE २००९ च्या कायद्याचे उल्लंघन सदर शाळा व्यवस्थापन करीत असल्याचा पालकांचा आरोप
नवी मुंबई, दि.२७ : शुक्रवार दिनांक २४/०६/२२ रोजी वाशी सेक्टर १५/१६ येथील आयसीएल शाळेत ५० ते ६० पालक आपल्या मुलांना मराठी माध्यमात प्रवेश मिळावेत म्हणून आंदोलन करण्यासाठी एकत्र जमले होते. यावेळी सदर शाळेने पालकांशी बोलायचेच नाही असे गेट वरील सुरक्षा रक्षकांना सांगितले असल्याने पालकांनी गेटसमोर घोषणाबाजी करुन न्याय मागण्याचा प्रयत्न केला. अखेर मोठा गोंधळ उडाल्याने शाळेने अखेर पोलिसांना पाचारण केले. यावेळी पालकांनी शाळा व्यवस्थापन पोलिसांना बोलावून पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्व पालक आणि शाळा व्यवस्थापना च्या राव मॅडम, प्राजक्ता जोशी, जिंदे मॅडम यांनाही पोलीस स्टेशन मध्ये बोलावून प्रवेशाबाबतीत चर्चा केली.
शाळा व्यवस्थापन पुर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी माहीती देऊन सरकारची व प्रशासनाची दिशाभूल करीत आहे. राज्यसरकार आणि केंद्र सरकारचे RTE 2009 च्या कायद्याचे उल्लंघन सदर शाळा व्यवस्थापन करीत असुन शाळेत सर्व काही व्यवस्थित असतांनाही जाणुन बुजून फक्त मराठी माध्यमांचे प्रवेश नाकारले जात आहेत. पोलिसांनी पालकांना वरीष्ठ पातळीवर प्रयत्न करावेत शाळेत येऊन शांतताभंग करु नये अन्यथा आपल्यावरही कारवाई करावी लागेल असा इशारा दिल्याने पालकांनी ही यापुढे आम्हीही कायदेशीर मार्गाने न्याय मिळवणारच असा ठाम निर्धार व्यक्त केला.
या आंदोलनातील पालकांचे नेतृत्व आयसीएल शाळा पालक संघटनेचे नरेंद्र वैराळ, अनिल घाणेकर, संतोष माने, सतीश वाळुंज, कल्पेश वागे, मनिषा गुप्ता, वागे आदींनी केले. शेकडो पालकांनी जो पर्यंत ॲडमिशन ह्याच शाळेत मिळत नाहीत तोपर्यंत कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचा ठाम निर्णय घेतला असुन फक्त पालकांना न्याय मिळावा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावेत म्हणून पालक संघटनेसोबत कायम राहणार असल्याचे सांगितले.
