नाशिकमधील बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव आजपासून झाला सुरु
नाशिक/मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर नाशिक जिल्ह्यातल्या बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव आजपासून सुरु होत आहेत.
केंद्र सरकारने छोट्या व्यापाऱ्यांसाठी दोन मेट्रिक टन तर मोठ्या पदांसाठी २५ मेट्रिक टन कांदा साठवणुकीची मर्यादा घातली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना नवीन कांदा घेऊन त्याची साठवणूक करण्यात अडचणी येत असल्याने व्यापाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून कांदा निलाव बंद केले होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे त्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराने काल कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
केंद्र सरकारने व्यापाऱ्यांसाठी साठवण मर्यादा वाढवून द्यावी यासाठी राज्य शासन पाठपुरावा करेल, असे आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी, कांदा लिलाव सुरु करण्याचे आवाहन या बैठकीत केले होते.
दरम्यान, केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक सीताराम मीना यांनी काल कांदा साठवणुकीबाबत सुधारित आदेश जारी केले असून, त्यात व्यापाऱ्यांना थोडा दिलासा दिला आहे. कांदा साठवणुकीच्या मर्यादेत वाढ करण्यात आली नसली तरी व्यापाऱ्यांकडे असलेला कांदा पॅकिंग करून तो अन्यत्र पाठवण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने घातलेल्या मर्यादेपूर्वी व्यापाऱ्यांकडे असलेला कांदा त्यांना आता विकता येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन कांदा खरेदी करता येणार असल्यामुळे अडचण येणार नाही.
