देशातील प्रत्येक नागरिकाचा लष्करावर पूर्ण विश्वास आहे – नरेंद्र मोदी
देशात शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे बोलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ कार्यक्रमाची सुरुवात केली. यानिमित्त कार्यकर्त्यांशी नरेंद्र मोदींनी संवाद साधला.
देशाचे वीर जवान सीमेवर आणि सीमेपार पराक्रम गाजवत आहेत. संपूर्ण देश आपल्या जवानांसोबत उभा आहे. अख्खे जग आपल्या इच्छाशक्तीला पाहात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणाव परिस्थितीवर भाष्य केले. देशातील प्रत्येक नागरिकाचा लष्करावर पूर्ण विश्वास आहे. ज्यामुळे लष्कराच्या कामगिरीवर परिणाम होईल किंवा शत्रूंना आपल्याकडे बोट दाखवण्याची संधी मिळेल’,असे आपल्याकडून काही होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, माझी प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे की, राष्ट्र निर्मितीच्या कार्यात मेहनतीने आणि जलद गतीने काम करावे. मी वैभवशाली भारताचे चित्र पाहात आहे. यावेळी निवडणुका आपला रंग दाखवतील, लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधकांत सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. देशाला वैभवशाली बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत विकासाच्या मार्गावर चालूयात, असे आवाहन मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.
भारतातील तरुणांनी आपापल्या परीने देशासाठी योगदान द्यावे असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. आज अशक्य गोष्ट ही शक्य होताना दिसत आहे असा विश्वास देशातील जनतेमध्ये निर्माण झाला आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, विरोधी पक्षांच्या मोठ्या टीकेनंतरही भाजपच्या ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ कार्यक्रमाला आजपासून सुरुवात झाली. पंतप्रधान मोदी यांनी एक कोटींहून अधिक भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
