राज ठाकरे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर संजय राऊत यांनी मांडलं मत
मुंबई, दि. १९: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मनसे आणि शिंदे गटातील संभाव्य राजकीय समीकरणांबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते यांनी आज पत्रकार परिषदेत या भेटीवर प्रतिक्रिया दिली. पत्रकारांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, “हा प्रश्न तुम्ही राज ठाकरेंना विचारा, मी इतकंच सांगतो की आम्ही त्याची हेरगिरी करत नाही. कोण कुणाला भेटतं त्यावर बंधनं नाही.”
यापुढे बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत म्हटलं, “एकनाथ शिंदे या प्रवृत्तीवरून आमचं टोकाचं भांडण आहे. कारण एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली. कारण त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा विचार आहे. एकनाथ शिंदेंचं हे नंदनवन बेईमानीतून निर्माण झालं आहे.”
भेटीत काय चर्चा झाली?
राज्यात अलीकडेच झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर प्रथमच आणि यांची काल दिनांक १८ फेब्रुवारी रोजी भेट झाली. ठाण्यातील शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी ही बैठक पार पडली.
सूत्रांच्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले. तसेच महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेकडून सहकार्य राहील, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर केडीएमसीसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकीय घडामोडींवरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे आणि शिंदे गटातील राजकीय समीकरणांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
