देशात रक्तदान, नेत्रदान आणि देहदान करण्यातही मध्यमवर्गच अग्रेसर आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई: काल(दि.२६) मुंबई वांद्रे-कुर्ला संकुलात महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा पार पडली. कसं काय मुंबई? सगळं काही ठीक आहे ना? असं विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरुवात केली. मुंबादेवी, सिद्धिविनायक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन मोदींनी भाषणाला सुरुवात केली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
काल वाराणासीमध्ये मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा माझे लहान भाऊ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आवर्जुन उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धावपळीतून ते उपस्थित राहिले त्यामुळे महायुतीला ताकत मिळाली, अशा शब्दांत मोदींनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले.
२०१९ची लोकसभा निवडणूक ही पक्षाची नसून देशाच्या विकासासाठीची महत्त्वाची निवडणूक आहे. देशाचा विकास करण्यासाठी नवीन मतदार माझ्या सोबत आहे. युतीला केवळ एका कुटुंबाचे राजकारण चालवायचे नाही. त्यामुळे आम्ही अनेक नवीन लोकांना संधी देत आहोत. आज कोट्यवधी तरुणांच्या डोळ्यांतील आशाआकांक्षांशी काँग्रेसला काही देणेघेणे नाही. पुढील पाच वर्षे देशासाठी फार महत्त्वाची आहेत. त्यासाठी सक्षम सरकार निवडणे महत्त्वाचे आहे असे मोदी म्हणाले.
देशाच्या उभारणीत मध्यमवर्गीयांचा वाटा मोठा आहे. ज्या मध्यमवर्गीयांना काँग्रेसने लोभी आणि अप्रामाणिक म्हणून हिणवले, त्याच करदात्या मध्यमवर्गीयांच्या जीवावर गेल्या पाच वर्षांत आम्ही देशाची प्रगती केली. आम्ही महागाईही रोखली, पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचे काम आम्हीच पहिल्यांदा केले. देशात रक्तदान, नेत्रदान आणि देहदान करण्यातही मध्यमवर्गच अग्रेसर आहे. अशा मध्यमवर्गाला काँग्रेस कधीच समजू शकली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. आपले सरकार मध्यमवर्गीयांची कमाई, दवाई आणि ईएमआयला पोषक राहिले आहे, याची आठवणही मोदींनी यावेळी करून दिली.
गरीबी हटावचा खोटा नारा देणारी ही निवडणुक नाही. आता खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीयांसाठी काम करायची गरज आहे. काँग्रेच्या सरकाने गेली ५० वर्ष लोकांची गरीब दूर करता करता स्वतःचीच गरिबी दूर केली. काँग्रेसचे सरकार म्हणजे भ्रष्टाचार, करवाढ आणि महागाई हेच चित्र आजपर्यंत होते; पण गेल्या पाच वर्षांत आम्ही हे सर्व बदलले आहे. भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण गेल्या पाच वर्षांत कोणी कधी ऐकले नाही.
सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वात कमी जागा जिंकण्याचा विक्रम केला, तर आता सन २०१९च्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात कमी जागांवर लढत आहे. ते ५० जागाही जिंकणार नाही, असे राजकीय पंडित सांगत आहेत, तर भाजपप्रणित एनडीए ३००हून अधिक जागा जिंकेल. त्यामुळे काँग्रेसला मतदान करून ते वाया घालवू नका, तर भाजपप्रणित ‘एनडीए’ला मत देऊन ते मजबूत सरकार आणण्यासाठी कारणी लावा’, असे आवाहन मोदी यांनी केले.
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे असे सांगत मोदी म्हणाले की, दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर केवळ गृहमंत्री, मंत्री बदलून गप्प बसण्याचे दिवस आता संपले. दहशतवाद्यांनी जर आगळीक केली तर ते पाताळात जरी लपून बसले तरी शोधून काढून मारू. हे आम्ही केवळ बोलत नाही तर करूनही दाखविले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेस मध्यमवर्गीयांना स्वार्थी म्हणते. पण त्याच मध्यमवर्गीयांच्या साथीने आज आम्ही देशातील सर्व महत्त्वाच्या योजना चालवत असल्याचे ते म्हणाले. देशासाठी पुढील पाच वर्षे फार महत्त्वाची आहेत. देशातील विविध योजनांना, पायाभूत क्षेत्र विकासाला पैसा पुरवून देश चालवतो. अशा मध्यमवर्गाचा काँग्रेस जाहीरनाम्यात साधा उल्लेखही नाही, अशा शब्दांत मोदी यांनी काँग्रेस मध्यमवर्गविरोधी असल्याचा दावा केला.
भाषणात त्यांनी मुंबईच्या किनारपट्टीचे संरक्षण करणारे कोळी बांधव, मुंबईचे डबेवाले, मुंबईची ओळख असलेल्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे चालक, सफाई कामगार आणि प्राणपणाने मुंबईचे संरक्षण करणाऱ्या मुंबई पोलिसांचे आभार मानले. या सभेत मोदींनी सर्वसामान्य मुंबईकरांना भावनिक साद घातली. प्रत्येकाने चौकीदार होऊन मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
