नागपुरात विधिमंडळाचा कायमस्वरुपी कक्ष सुरू होणे हा ऐतिहासिक क्षण – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
नागपूर, दि. ४ : “नागपूर विधानभवनात कायमस्वरुपी कार्यरत विधिमंडळ कक्षामुळे विदर्भाच्या आकांक्षांना न्याय मिळणार आहे. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतर विदर्भासाठी हा दुसरा मोठा ऐतिहासिक क्षण असल्याचे भावपूर्ण उद्गार महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काढले.
यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, संसदीय कामकाज मंत्री अॅड.अनिल परब, क्रीडामंत्री सुनील केदार व्यासपीठावर उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणालीद्वारे(ऑनलाईन) महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख सहभागी झाले होते.

नागपूर करारानुसार महाराष्ट्र विधानमंडळाचे वर्षातील एक अधिवेशन नागपूर येथे दरवर्षी होत असते. मात्र, अधिवेशन संपल्यानंतर नागपूर येथील विधानमंडळ सचिवालयात कोणतेही कामकाज होत नाही. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पुढाकार घेत या ठिकाणी वर्षभर कार्यरत असणारा कायमस्वरुपी कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. या कक्षाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये पटोले यांनी ही घटना महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले. लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. ज्यांना सभागृहात सहजासहजी प्रवेश मिळत नाही, त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत बसून हा ऐतिहासिक सोहळा अनुभवता येत आहे. लोकशाही अधिकाधिक जनताभिमुख करण्याची ही प्रक्रिया असून आता यापुढे विधानमंडळातील ग्रंथालयही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरपाठोपाठ पुणे येथेही विधिमंडळाचा अशाच पद्धतीचा कक्ष सुरु करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली.
अनुशेष दूर करण्यासह विदर्भातील सर्व प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी हा कक्ष सहाय्यभूत ठरेल. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात अशा पद्धतीच्या उपाययोजना ही काळाची गरज आहे. पुढील काळात कोरोनासारख्या महामारीच्या आकस्मिक परिस्थितीमध्ये सामूहिक सहभागासाठी अशा पद्धतीच्या व्यवस्थेसाठी महाराष्ट्र विधिमंडळ कायम प्रयत्नशील असेल, अशी ग्वाही पटोले यांनी यावेळी दिली.
