स्वच्छता कार्यात मनपाच्या सहा पोकलेनची भर
नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी यांच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी सफाई अभियान राबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील तीनही नद्यांसह नाल्यांची सफाई करण्यात येते. यामध्ये नदी व नाल्यांमधील गाळ, माती काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात येतो. यंदा १ जानेवारीपासून सुरू झालेल्या नदी स्वच्छता अभियानाचा मनपा आयुक्तांद्वारे वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. नदी स्वच्छतेचे कार्य व्यवस्थित व सखोल व्हावे यादृष्टीने ते लक्ष देत आहेत.
नदी सफाई कार्यामध्ये मनपाचे ५ मोठे व १ लहान असे एकूण ६ पोकलेन दाखल झालेले आहेत. नाग नदीच्या अंबाझरी, अशोक चौक, पारडी पूल येथील पात्रांमध्ये पोकलेनद्वारे स्वच्छता कार्य सुरू आहे. अंबाझरी जवळील नाग नदीच्या पात्रामध्ये लहान पोकलेनद्वारे स्वच्छता केली जात आहे. तर मोठ्या पोकलेनद्वारे अशोक चौक व पारडी पूल येथे तर पिवळी नदीच्या गोरेवाडा व मानकापूर येथील पात्रामध्ये स्वच्छता कार्य सुरू आहे. तसेच पोहरा नदी मध्ये सुद्धा एक पोकलेन कार्यरत केलेला आहे. येथील स्वच्छता कार्य पूर्ण झाल्यानंतर यापुढील भागांमध्ये स्वच्छता केली जाणार आहे. ही माहिती मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी दिली.
नागपूर शहरातून व शहरालगत वाहणा-या नाग नदीची लांबी १६.५८ किमी, पिवळी नदीची लांबी १७.४२ किमी आणि पोहरा नदीची लांबी १५.१७ किमी आहे. या तीन प्रमुख नद्यांसोबतच हत्तीनाला, गड्डीगोदाम, बाळाभाऊपेठ, बोरीयापूरा, डोबीनगर, लाकडीपूल, तकीया, नरेंद्रनगर, बुरडनाला आदी मोठे आणि इतर छोटे असे एकूण २३२ नाले शहरात आहेत. या सर्व नदी आणि नाल्यांच्या स्वच्छतेसाठी मशीनसोबतच मनुष्यबळाचा देखील उपयोग करण्यात येतो. पावसाळ्यात पूर परिस्थिती उद्भवू नये याकरिता मनपाद्वारे नदी स्वच्छता अभियान राबविले जाते. गुरुवारी मुख्य अभियंता राजीव गायकवाड अधिक्षक अभियंता मनोज तालेवार आणि संबंधीत कार्यकारी अभियंता यांनी नदी सफाई अभियान कार्याची पाहणी केली.
असे होणार नदी स्वच्छता कार्य
नाग नदी : अंबाझरी तलाव ते पंचशील चौक, पंचशील चौक ते अशोक चौक, अशोक चौक ते सेंट झेव्हिअर स्कूल, सेंट झेव्हिअर स्कूल ते पारडी उड्डाण पूल (भंडारा रोड), पारडी उड्डाण पूल ते पूनापूर (भरतवाडा – नाग व पिवळी नदी संगम).
पिवळी नदी : गोरेवाडा तलाव ते मानकापूर दहनघाट, मानकापूर दहन घाट ते कामठी रोड पूल, कामठी रोड पूल ते जुना कामठी रोड पूल, जुना कामठी रोड पूल ते पूनापूर (भरतवाडा – नाग व पिवळी नदी संगम).
पोहरा नदी : सहकार नगर ते नरेंद्र नगर पूल, बेलतरोडी ते पिपळा फाटा, पिपळा फाटा ते नरसाळा विहिरगाव.
