महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष प्रत्येकी ९० जागा लढवणार; कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितला नवीन फॉर्म्युला
मुंबई, दि. २५: दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतर्फे पत्रकार परिषद घेत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला होता. यावेळी मविआतील प्रत्येक घटकपक्ष ८५ जागा लढवेल व उर्वरित जागा या घटकपक्षांना सोडल्या जातील असे जाहीर करण्यात आले होते. परंतू, आज या फोर्म्युल्यात बदल करण्यात आला आहे. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष प्रत्येकी ९० जागा लढवणार आहेत. उरलेल्या १८ जागा मित्र पक्षांना दिल्या जातील, अशी माहिती काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज दिली.
राज्यात विधानसभा निवडणूक हरण्याच्या भीतीने भारतीय जनता पक्ष अफवा पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना म्हणाले. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका विधानाची मोडतोड करून या अफवा पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
