Warning
मुंबईच्या लाईफलाइनवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा, सर्व रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट
येत्या तीन महिन्यात मुंबईची लाईफलाइन असलेल्या लोकलवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा इशारा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्यामुळे रेल्वेने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करत अतिदक्षेचा इशारा दिला आहे.
अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क आहे.
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलने दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. हल्ल्याची सूचना मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली असून संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, रेल्वे स्थानकांवर विशेष करून लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये शोध मोहीम हाती घेण्याच्या सूचना बुधवारी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बुधवारी रात्री कर्जत ते आपटे मार्गावर धावणार्या बसमध्ये जिवंत बॉम्ब आढळून आला तसेच कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेस शौचालयातील दुर्घटना या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट घोषित केला आहे. गुप्तचर संघटनेच्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत मुंबईत रेल्वे स्थानकांवर हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे तीन महिन्यांसाठी मुंबईतील रेल्वे स्थानकांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: दिल्लीकडून येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमध्ये बॉम्बशोधक पथकाद्वारे आणि श्वान पथकाद्वारे तपासणी करण्याचे आदेश आहेत.
