न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर झाली सुनावणी
मुंबई, दि. २५: बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा ठाणे पोलिसांनी केलेल्या चकमकीत मृत्यू झाला. हि बातमी जशी बाहेर आली तशा त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. विरोधकांकडून व सामाजिक कार्यकर्त्यांकडून हि चकमक बनावट असल्याचा आरोप करण्यात आला. खुद्द अक्षय शिंदे च्या कुटुंबीयांनी या घटनेच्या सत्यतेवर आक्षेप घेत काल मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी त्यांनी पोलिसांची चांगलीच हजेरी घेतली. मयत अक्षय शिंदेने पोलिसाकडचं शस्त्र हिसकावून गोळीबार केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली. गोळीबाराच्या बाबतीत प्रशिक्षित असलेले पोलिस आरोपीला आवरु शकले नाहीत. यावर कसा विश्वास ठेवायचा याला चकमक म्हणता येणार नाही, ही चकमक नाहीच, असं मत न्यायालयानं व्यक्त केलं.
या चकमकीनंतर पोलिसांनी काय पावलं उचलली याची विचारणा न्यायालयाने केली. या घटनेच्या दृश्यांमधे फेरफार टाळण्यासाठी ते सील केलं आहे का, या घटनेतलं शस्त्र पिस्तुल होतं, की रिव्हॉलवर, असे प्रश्न न्यायालयाने विचारले. या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी अपेक्षित आहे. तशी ती होत नसल्याचं दिसलं, तर आम्हाला आदेश काढावा लागेल, असं न्यायालयाने यावेळी बजावलं. दरम्यान या प्रकरणी पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवला जावा, तसंच या घटनेशी संबंधित सीसीटिव्ही चित्रण सुरक्षित ठेवलं जावं, अशी मागणी अक्षय शिंदेच्या वडीलांच्या वकीलांनी आजच्या सुनावणीदरम्यान केली.
Source – AIR
