राज्यभरातील आंदोलनाचा आढावा
राज्यभरातील आंदोलनाचा आढावा:
धुळे आगारातील एसटी कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले असल्याची माहिती इंटकचे विभागीय अध्यक्ष रामेश्वर चत्रे यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री, दोंडाईचा आगारातील एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. धुळ्यात मध्यवर्ती बसस्थानक येथे सर्व एसटी कामगार धरणे आंदोलन करीत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे आठही तालुक्यात एसटी सेवा बंद आहे. दिवाळीनंतर कोल्हापूर, पुणे इथले चाकरमानी आज सर्वत्र एसटी स्टॅन्ड वर थांबलेले होते. जोपर्यंत आम्हाला न्याय दिला जात नाही, तोपर्यंत आमच आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. दरम्यान सावंतवाडी एसटी डेपो समोर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भेट देऊन आंदोलकांच म्हणण जाणून घेतलं. यावेळी आंदोलकांनी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही शासनाचं लक्ष वेधावं अशी मागणी केली.
दरम्यान मागील तीन दिवसांपासून बीड एसटी आगारात आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी एका एसटी चालकाने काल संध्याकाळी विषारी औषध द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या चालकाची प्रकृती गंभीर असून जिल्हा रूग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही या संपा’ला शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहेत. आज ब्रम्हापूरी आगारातील वाहतूक नियंत्रकानी आपल्या राहत्या घरी विषप्राशन करून आत्महत्या केली. या आत्महत्येमागचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, ठाकूर मागील तीन दिवसापासून कोणालाही भेटले नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहेत. घटनेचा तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत.नंदुरबार जिल्ह्यातुन. काल रात्रीपर्यत सुरु असणारी बस सेवा अचानक बंद झाल्याने सणासुदीच्या काळात प्रवाश्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, नवापुर, शहादा, तळोदा या बसस्थानकांमध्येही बससेवा पुर्णतः बंद होती. नंदुरबार बस स्थानकातुन तालुका अंतर्गत वाहतुक सुरळीत असल्याने इथे मात्र तालुक्यातील प्रवाश्यांसाठी काहीसे दिलासादायक चित्र दिसुन आले.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलानात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होत असल्याचं आज प्रसिद्ध केलेल्या पत्राद्वारे सांगण्यात आलं आहे.
