संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आज शेवटचा दिवस
मुंबई, दि.२२: एसटीच्या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आजपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. त्यानुसार गेल्या सोमवारपासून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर रूजू होत आहेत. यात चालक आणि वाहकांचा मोठा समावेश आहे. त्यामुळं सहा महिन्यापूर्वी विस्कळीत झालेली एसटीची सेवा आता पूर्वपदावर येतेय. एसटीच्या ताफ्यातल्या १४ हजार बस गाड्यांपैकी गुरुवारपर्यंत ९ हजार ७८६ बस रस्त्यावर धावत होत्या. या बस गाड्यांच्या ३० हजाराहून अधिक फेऱ्या कालपर्यंत झाल्या. एसटीच्या ९० हजार कर्मचाऱ्यांपैकी ७४ हजार कर्मचारी गुरुवारपर्यंत कामावर रुजू झाले होते. संपामुळे राज्यातील प्रवाशांचे विशेषता विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले होते. एसटी पूर्वपदावर येवू लागल्याने राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळालाय. बस गाड्या जवळजवळ सहा महिने बंद राहिल्याने त्यांच्या दुरूस्तीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत.
