सर्व खबरदारी घेत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला अखेर आज झाली सुरुवात
एक ऑक्टोबरपर्यंत चालणारं हे अधिवेशन कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर सकाळी ९ ते ११ आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ७ या वेळेत दोन सत्रांमध्ये चालणार आहे. अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस वगळता उद्यापासून राज्यसभेचं कामकाज सकाळच्या सत्रात होणार असून लोकसभेचं कामकाज संध्याकाळच्या सत्रात होणार आहे.
दरम्यान, सरकार विरोधकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे, असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सांगितलं. लोकसभेमध्ये अनेक विरोधकांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द केल्याबद्दल घोषणाबाजी सुरु केल्यावर ते बोलत होते. सर्व संसद सदस्यांनी सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं.
प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यास आणि शून्य प्रहराचा अवधी अर्ध्या तासावर आणण्यास बहुतेक सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मान्यता दिली आहे, याचं स्मरण त्यांनी सदनातील सदस्यांना करून दिलं. प्रारंभी प्रश्नोत्तराच्या तासाबद्दल काँग्रेसच्या अधिर रंजन चौधरी यांनी विरोध व्यक्त केला होता.
एम. आय. एम. चे असदुद्दिन ओवेसी आणि काँग्रेसच्या मनीष तिवारी यांनीही प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याच्या निर्णयास आपला विरोध असल्याचं सांगितलं होतं.
