“सर्वपक्षीय बैठकीत कृषी कायद्यांवर मोकळेपणाने चर्चेस तयार” – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली: कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर सरकार मोकळेपणानं चर्चा करायला तयार आहे, सरकारची भूमिका २२ जानेवारीला जशी होती तशीच आजही आहे आणि कृषिमंत्र्यांनी दिलेला प्रस्ताव अद्याप कायम आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केलं.
चर्चा पुढे नेण्यासाठी कृषिमंत्री एका फोनवर उपलब्ध असल्याचं मोदी म्हणाले. दूरदृश्य प्रणाली द्वारे झालेल्या या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमधले नेते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी सरकारचा प्रस्ताव स्वीकारून पुढची चर्चा करावी, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
नेहमी अधिवेशनापूर्वी होणारी ही बैठक यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर आयोजित करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज ५-५ तासाच्या सत्रामध्ये विभागण्यात आलं आहे. राज्यसभेचं कामकाज सकाळच्या सत्रात तर लोकसभेचं कामकाज दुपारच्या सत्रात होणार आहे.
