मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन
नवी मुंबई, दि.६: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत विविध मुद्यांना स्पर्श करत माध्यमांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, “सरकारने जो कायदा आणलेला आहे तो कायदा चुकीचा नाही. त्यात काही त्रुटी असतील. त्या-त्या राज्यातल्या सरकारांशी त्यांच्या कृषी धोरणांनुसार केंद्र सरकारने समन्वय साधून कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये सर्व नियंत्रण जाऊ नये हीच देशवासियांची इच्छा आहे.”
आंदोलनस्थळी सरकारने ठेवलेल्या कडेकोट बंदोबस्ताबाबत भाष्य करताना ते म्हणाले की, “चीन-पाकिस्तानच्या सीमेवरही इतका कडेकोट बंदोबस्त नसेल इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची काहीही आवश्यकता नाही. शेतकरी आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असताना पंतप्रधानांनी लक्ष घालून प्रश्न मिटवायला हवा.”
