भारतीय उद्योग जगातला मोठा धक्का
पालघर/मुंबई, दि. ४ : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे आज रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी पालघर येथे झालेल्या कार अपघातात निधन झाले. पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. सायरस मिस्त्री हे त्यांच्या मर्सिडीज कारने अहमदाबादहून मुंबईला परतत असताना कार दुभाजकावर आदळली तेव्हा हा अपघात झाला. अपघातानंतर कारच्या चिंधड्या उडाल्या. मुंबई – अहमदाबाद महामार्गावर सूर्या नदीवर बांधलेल्या पुलावर हा अपघात झाला. आज दुपारी ३.३० च्या सुमारास हा अपघात झाला. कारमध्ये एकूण चार जण होते. सायरस मिस्त्री यांच्याशिवाय जहांगीर दिनशा पंडोल यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
त्याचबरोबर अनायता पांडोळे आणि दर्यास पांडोळे या महिला जखमी झाल्या आहेत. दोन्ही जखमींना वापीच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सायरस मिस्त्री यांचे पार्थिव सध्या पालघर येथील कासा रुग्णालयात आहे. सायरस मिस्त्री यांचे पार्थिव मुंबईला नेण्याची योजना आहे. त्यांचे पोस्टमॉर्टम मुंबईतील जेजे रुग्णालयात होण्याची शक्यता आहे. सायरस मिस्त्री यांचे पार्थिव विमानाने आणायचे की रस्त्याने आणायचे याबाबत निर्णय घेतला जात आहे.
