खाण मंत्रालयाकडून ग्रॅनाईट आणि संगमरवर खाणकामाबाबत बंगळुरू येथे कार्यशाळेचे आयोजन
बंगळुरू, दि. ३०: खाण मंत्रालयाने बंगळुरू येथे ग्रॅनाईट आणि संगमरवर खाणकामाबाबत कार्यशाळेचे आयोजन केले होते. खाण मंत्रालयाचे सचिव व्ही. एल. कांथा राव यांनी कार्यशाळेच्या उदघाटन सत्राला संबोधित केले. भारत सरकारने खनन क्षेत्रात हाती घेतलेले विविध उपक्रम आणि सुधारणांवर त्यांनी भर दिला. राज्य सरकारांनीदेखील गौण खनिज क्षेत्रात अशा प्रकारच्या सुधारणा हाती घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. उत्खननाबाबत केंद्र सरकारने एनजीडीआर (नॅशनल जिओ-डेटा रिपॉझिटरी-राष्ट्रीय भूविज्ञान माहिती भांडार) पोर्टलच्या माध्यमातून सर्व हितधारकांसाठी डेटामध्ये प्रवेश सुलभ करून सर्वसमावेशक डेटा आणि माहिती उपलब्ध करून दिली असल्याकडे व्ही. एल कांथा राव यांनी लक्ष वेधले.
गौण खनिज क्षेत्रामध्ये सर्वांगीण सुधारणेसाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून सहयोगी पुढाकारासाठी त्यांनी आवाहन केले. उद्योग प्रतिनिधी आणि राज्य सरकारांना उपाय शोधण्यासाठी ही कार्यशाळा उत्तम मंच ठरेल, असे ते म्हणाले. 
कर्नाटक सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि विकास आयुक्त डॉ. शालिनी रजनीश यांचे बीजभाषण यावेळी झाले. ग्रॅनाईट आणि संगमरवर खान क्षेत्रातील प्रशासकीय, तांत्रिक आणि इतर समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सरकार आणि उद्योग यांच्यातील सहकार्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. उद्घाटन सत्रानंतर विविध भागधारकांनी ग्रॅनाईट आणि संगमरवरी खाण यावरील विविध मुद्द्यांबाबत सादरीकरण केले.
