मुंबई – ठाणे प्रवास गतिमान करणारा मेट्रो मार्गिका ४ प्रकल्प वेळेत पूर्ण होईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : मुंबईकरांसोबतच ठाणेकरांचाही दैनंदिन प्रवास आरामदायी आणि गतिमान होण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मेट्रो मार्गिका ४ आणि ४ अ प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, अशी ग्वाही देतानाच मुंबई महानगर परसिरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हा प्रकल्प आमूलाग्र बदल घडवेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुंबई मेट्रो मार्गिका ४ व ४ अ या प्रकल्पासाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यु विकास बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्ज करारावर मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव आणि जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत जे. मोहार्ड यांनी करारावर स्वाक्षरी केली.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुसह्य होण्यासाठी मेट्रोच्या प्रकल्पांना गती दिली जात आहे. मेट्रो मार्गिका ४ आणि ४ अ साठी केएफडब्ल्यू संस्थेने मंजूर केलेले भारतातील सर्वात जास्त रक्कमेचे कर्ज आहे. सुमारे दोन लाख प्रवासी दररोज ठाणे मुंबई प्रवास करतात. पुढील काही वर्षात मुंबईतील सार्वजनिक दळणवळण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून त्यामुळे मुंबईकराचं गतिमान प्रवासाचं स्वप्न साकार होणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, केएफडब्ल्यू संस्था महाराष्ट्रासोबत पहिल्यांदा करार करीत आहे. हा प्रकल्प मुंबई महानगरातील प्रवाशांसाठी वरदान ठरणार असून या प्रकल्पामुळे मुंबई आणि ठाणे हे दोन महानगरे जोडली आहेत. कोरोना काळात जम्बो उपचाराच्या सुविधांच्या उभारणीत एमएमआरडीएने महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल शिंदे यांनी कौतुक केले.
यावेळी राजीव यांनी प्रास्ताविक करताना प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपरमुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, ‘एमएमआरडीए’चे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. गोविंदराज आदी उपस्थित होते.

मुंबई मेट्रो मार्गिका ४ प्रकल्पाचे वैशिष्ट्ये :
केएफडब्ल्यु विकास बँकेकडून घेण्यात येणाऱ्या मुंबई मेट्रो मार्गिका ४ व ४- अ या प्रकल्पासाठी कर्ज करार.
५४५ दशलक्ष युरो कर्ज हे KFW या संस्थेने मंजूर केलेले भारतातील सर्वात जास्त रक्कमेचे कर्ज आहे. भारतातील इतर प्रकल्पाकरिता दिलेल्या कर्जपुरवठ्यापैकी हे कर्ज सर्वात कमी व्याजदराचे आहे.
मुंबई मेट्रो मार्गिका ४ – वडाळा-कासारवडवली आणि मार्गिका ४ – अ कासारवडवली ते गायमुख ह्या मेट्रो मार्गिकांच्या अंमलबजावकरिता केएफडब्ल्यू या जर्मन विकास बँकेकडून एकूण ५४५ दशलक्ष युरो इतक्या रक्कमेचे कर्ज इंडो जर्मन विकास सहाय्य अंतर्गत मंजूर.
