परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आजपासून उझबेकिस्तान आणि स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर
परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आजपासून उझबेकिस्तान आणि स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. २६ सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात त्या उझबेकीस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल अझीझ कामिलोव्ह आणि सांस्कृतिक मंत्री ओझोड्बेक नझरबेकोव्ह यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
प्रसिद्ध ताश्कंद स्टेट विद्यापीठामध्ये लेखी यांचं भारताची लोकशाही परंपरा या विषयावर व्याख्यान होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बुखारा स्टेट विद्यापीठामध्ये त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
२७ ते ३० सप्टेंबर दरम्यान मीनाक्षी लेखी स्वित्झर्लंड दौऱ्यावर असून त्यामध्ये त्या परराष्ट्र मंत्रालयाचे उच्चायुक्त डॉक्टर इग्नजिओ कॅसीस आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे उच्चायुक्त एलेन बर्सेट यांच्याशी चर्चा करणार आहेत. तिथे त्या अनिवासी भारतीय समुदायाशी आणि जिनिव्हा आंतरराष्ट्रीय समुदायाशी संवाद साधणार आहेत.
