मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून चार आठवड्यासाठी स्थगित
नवी दिल्ली/मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयानं चार आठवड्यांसाठी स्थगित केली आहे. या प्रकरणात राज्याचे वकील मुकुल रोहतगी उपस्थित राहु शकले नाहीत, त्यामुळे न्यायालयानं सुनावणी काही काळासाठी तहकुब केली होती.
त्यानंतर या प्रकरणी जर सरकारला घटनापीठापुढे जायचं असेल तर त्यासाठी चार आठवड्यांची मूदत देत आजची सुणावणी स्थगित केली. मागच्या सुनावणीच्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली होती. त्यानंतर ही या प्रकरणासंदर्भातली पहिलीच सुनावणी होती.
दरम्यान मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपिठानं यापूर्वीच दिला आहे.
त्यामुळे या खंडपीठाचा अंतरिम आदेश निरस्त करायच्या अर्जावरची सुनावणी घटनापीठापुढेच झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचे, मराठा आरक्षणविषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल म्हटलं होतं. तशी विनंतीही न्यायालयाला करणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं होतं.
