काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांनी मणिपूर घटनेवर अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे केली चर्चेची मागणी
मुंबई, दि. २१: मणिपूरमधील दोन महिलासोबत झालेल्या अमानुष क्रूरतेचा मुद्दा आता महाराष्ट्राच्या विधानसभेत तापू लागला आहे. या मुद्द्यावरून आज सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांनी मणिपूर घटनेवर चर्चेची मागणी केली आहे. मणिपूरमधील घृणास्पद घटनेचा निषेध करण्यासाठी विरोधक ठरावाची मागणी करत आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांच्या मागण्यांचा विचार न करता सभागृहाच्या कामकाजाच्या नियमानुसार त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत का, अशी विचारणा केली.
आपल्या या मागणीवर विरोधक आक्रमक दिसले. सभागृहाच्या हौदात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विरोधकांनी ‘मौनी बाबा हाय हाय’च्या घोषणा दिल्या. विरोधी पक्षाच्या सर्व महिला आमदार सभागृहाच्या वेलमध्ये येऊन निषेध करत आहेत. तसेच अध्यक्षांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली. काँग्रेस आमदारांनीने अध्यक्ष असंवेदनशील असल्याचा आरोप करत विरोधकांना बोलू न देण्याच्या कृतीचा निषेध केला. निर्णय देताना अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहाच्या नियमानुसार मागणी मांडावी, विरोधकांना चर्चेसाठी वेळ दिला जाईल, असे म्हटले आहे. अखेर मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला.
विधिमंडळाच्या पायर्यांवर महाविकास आघाडी तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जयंत पाटील,आ. भाई जगताप, बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडीतील इतर आमदार उपस्थित होते.
