मल्लिकार्जुन खरगे यांनी मारली बाजी; कॉंग्रेस च्या अध्यक्षपदी झाली निवड
नवी दिल्ली, दि. १९ : काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झाली आहे. प्रतिस्पर्धी शशी थरूर यांना त्यांनी प्रचंड मताधिक्याने पराभूत केलं. खरगे यांना ७ हजार ८९७ मतं मिळाली तर थरुर यांना १ हजार ७२ मतं मिळाल्याचं वृत्त आहे. गेल्या सोमवारी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी ९ हजार ३८५ मतदारांनी मतदान केलं होतं.
त्यातली ४१६ मतं अवैध ठरली, अशी माहिती काँग्रेसचे पक्ष निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री यांनी दिली आहे. तब्बल २५ वर्षानंतर प्रथमच काँग्रेसला गांधी कुटुंबातला सदस्य नसलेला अध्यक्ष मिळाला आहे. या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खर्गे यांचं अभिनंदन केलं आहे.
