महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात जनवादी महिला संघटनेची निदर्शने
उरण, दि.१३(विठ्ठल ममताबादे): मुंबईतील साकिनाका येथे एक महिलेवर अमानुष अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्त्या करण्यात आली. याचे तीव्र प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. या घटनेचा रायगड जिल्हा जनवादी महिला संघटनेने उरण येथील पोलिस ठाण्यावर मोर्चा नेत जाहीर निषेध केला. यावेळी पोलिसांना निवेदनही देण्यात आले. राज्याच्या राजधानीत तसेच देशाच्या राजधानीतही महिलांवर सामुहिक बलात्कारा करून मारून टाकण्याचे प्रकार भयंकर वाढत चालले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्याची विकृती फोफावतांना दिसते. महिलांच्या बाजूने कायदे नूसते कागदावर लिहून ठेवले आहेत. त्याची अंमलबजावणी केली जात नाही. कायदयातून पळवाट काढून आरोपी मोकाट सुटले जातात. काही वेळेला वैद्यकीय तपासणी वेळेवर होत नाही. अशा त्रुटी ठेवल्या जातात.
अशा वेळेला कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. निवेदनात महिलेवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना त्वरित अटक करावी, पीडित महिलेच्या घरातील कुटुंबियांना संरक्षण द्यावी, पीडित महिलेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजनेतून तातडीने आर्थिक मदत द्यावी, आरोपींना शिक्षा करण्यासाठी पोलीस यंत्रणा राबवून खटला जलदगती न्यायालयात चालवा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील, रायगड जिल्हा अध्यक्ष अमिता ठाकूर, कुसुम ठाकूर, नीरा पाटील, तारा ठाकूर, नाहिदा ठाकूर, सविता पाटील, कुंदा पाटील, समिया बुबेरे व हुसेना शेख यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
