उत्तरप्रदेश ला मागे टाकत साखर निर्यातीत महाराष्ट्र अव्वल; ४१ टक्के निर्यातीचे गाठले उद्दिष्ट
देशभरातून आत्तापर्यंत निर्यात झालेल्या साखरेपैकी सुमारे ४१ टक्के साखर केवळ महाराष्ट्रातील कारखान्यांकडून निर्यात करण्यात आली आहे. एप्रिल अखेरपर्यंत महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी सर्वाधिक ४१ टक्के तर त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशने सुमारे २९ टक्के आणि कर्नाटकातील कारखान्यांनी अंदाजे ११ टक्के साखरेची निर्यात केली आहे.
साखर निर्यातदार संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल अखेरपर्यंत महाराष्ट्रातील विविध कारखान्यांनी मिळून सुमारे २५ लाख टन साखर निर्यातीचे करार केले असून त्यापैकी सुमारे २० लाख टन साखरेची निर्यात झाली आहे.
राज्यातील मुंबई व्यतिरिक्त रत्नागिरीतील जयगड बंदरातूनही साखरेची निर्यात सुरु आहे, त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांना अन्य काही राज्यांच्या तुलनेत कमी खर्चात निर्यातीसाठीची साखर बंदरात पाठवणे शक्य होत आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला चांगला दर मिळत असल्यानं येत्या काही काळात जास्तीतजास्त साखर निर्यात करण्यावर राज्यातील कारखान्यांचा भर राहणार असल्याचं साखर कारखानदार संघटनेच्या सूत्रांनी स्पष्ट केलं.
