नवी मुंबई कृषिउत्पन्न बाजार समितीसह राज्यातील अनेक बाजारांचे व्यवहार ठप्प
मुंबई, दि.११: लखीमपुर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशभर राजकीय वातावरण तापलेलं असून याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीतील तीनही घटकपक्षांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली आहे. बंद च्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मुंबईत काही ठिकाणी बेस्ट बस फोडण्याच्या काही घटना घडल्या असून राज्यातल्या काही भागात एसटी बसेसवर दगडफेकीचे प्रकार समोर आले आहेत. नवी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यापार्यांनी बंद ला पाठिंबा दिल्यामुळे बाजारातील सर्व व्यवहार आज ठप्प झालेले पाहायला मिळाले. आजच्या बंद चा मोठा फटका हा अपेक्षेप्रमाणे सामान्य माणसाला बसला असून मुंबई, ठाणे सारख्या भागांत बस सेवा ठप्प झाल्यामुळे ऑफिस ला पोहोचण्यासाठी त्याला मोठी कसरत करावी लागली. तुरळक प्रमाणात चालू असलेल्या रिक्षा-टॅक्सी सेवांवर यामुळे मोठ्या प्रमाणात ताण पडलेला दिसतोय.

आजच्या महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार आशिष शेलार तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व या दोघांमध्ये शाब्दिक द्वंद पाहायला मिळाले. मुळात दुसर्या राज्यात झालेल्या हिंसाचारासाठी आपल्या राज्यात बंद का पाळला जातोय हे अनाकलनिय असल्याची प्रतिक्रिया सामान्य जनतेतून उमटत असून कोविड काळातील टाळेबंदीमुळे राज्याचं अर्थचक्र कोलमडलं असताना आणखी किती ‘बंद’ आम्ही सहन करायचे असा उद्विग्न सवालही विचारला जातोय.
