आज राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर; हवामान विभागाकडून मुळसाधार पावसाचा इशारा
मुंबई, दि. २२: राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर कायम आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्याच्या अन्य भागातही होत असलेल्या संततधार पावसाचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. कोकण पट्ट्यातील पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांना आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर केला आहे.
रायगड जिल्ह्यात चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून मालमत्तेचे मोठं नुकसान झालं आहे. आजही येथे रेड अलर्ट जाहीर केला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी आहे. नदी काठच्या आणि दरडप्रवण भागातील ७६६ जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. जिल्ह्यातील १८ धरणं तुडूंब भरली आहेत.
पालघर जिल्ह्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांनाही आज सुट्टी जाहीर केली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं एक पथक वसई-विरार भागात पाचारण करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी जगबुडी आणि कोदवली नदी अद्याप इशारा पातळीवर वाहत आहे. जिल्ह्यातील शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी पुलावर येऊन वाहतूक खोळंबली होती. कुडाळ एमआयडीसी इथं रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक साडेतीन तास ठप्प झाली होती. संध्याकाळी वाहतूक पूर्ववत झाली. जिल्हयात आतापर्यंत ४८ कुटुंबातल्या १८६ लोकांना त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आलं आहे.
मुंबईत गेले चार दिवस संततधार पाऊस आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस होत आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुघलकालीन कावनई किल्ल्याचा काही भाग काल दुपारी कोसळला. किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना अन्यत्र हलवण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला असून दरडप्रवण क्षेत्रातील ३६१ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील पोहाळे ते बाजार भोगाव रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने कोल्हापूर ते राजापूर हा राज्य मार्ग काल बंद करण्यात आला. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
जळगाव जिल्ह्यात दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पुर आला आहे. तापी नदीवरील हतनुर धरणाचे १८ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यात तारदरवाडी इथला तलाव फुटला आहे. याठिकाणी आपत्ती निवारण पथक तैनात करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र काल पावसाची संततधार सुरू होती. वर्धा नदीच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून अद्याप कुठेही पूरसदृश स्थिती नाही. मात्र, सततच्या पावसामुळे विविध तालुक्यात शेतं पाण्याखाली आली आहेत. यवतमाळमध्येही जोरदार कोसळणाऱ्या पावसाने शेतजमीन खरडून गेली आहे. नुकसानग्रस्त शेतींचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सबंधित तालुका प्रशासनाला दिल्या आहेत.
अकोला जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे काटेपूर्णा सिंचन प्रकल्पाच्या जलसाठ्यात बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आले असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने जेजुरी इथं उद्या होणारा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
Source – AIR
