लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करुन राज्यसभेचं कामकाज तासाभरासाठी तहकूब
नवी दिल्ली: राज्यसभेचं कामकाज आज सकाळी सदनाच्या माजी सदस्य, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानिमित्त एक तासाकरता स्थगित करण्यात आलं. त्यापूर्वी सकाळी कामकाज सुरु झाल्यावर सदस्यांनी मौन पाळून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
लता मंगेशकर यांच्या निधनानं देश एका महान गायिकेला मुकल्याचं सभापती एम. वेंकय्या नायडू यावेळी म्हणाले. सात दशकांच्या आपल्या कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी हजारो गाणी म्हटली असून त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. लता मंगेशकर हे भारतीय संगीत आणि चित्रपट सृष्टीतलं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. आपल्या गाण्यांमधून त्यांनी सर्व प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. त्यांचं गाणं देशाच्या विविधतेशी नातं जोडणारं होतं. तसंच देशाच्या प्रवासातला प्रत्येक प्रसंग आणि टप्पा यामधून उमटल्याचं सांगून नायडू यांनी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली.
Source-AIR
