लाड समितीच्या शिफारशीनुसार नियुक्तीबाबत आयुक्तांनी घेतली बैठक
नागपूर, दि. ७: सेवानिवृत्त/ स्वेच्छा सेवानिवृत्त/मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती करण्याबाबत गठीत समितीची आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी काल बुधवारी दि. ६ रोजी बैठक घेतली.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षात पार पडलेल्या बैठकीत मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त निर्भय जैन, मुख्य लेखा परीक्षक गौरी ठाकूर, विधी अधिकारी ऍड. प्रकाश बरडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत सर्वप्रथम अधिकाऱ्यांनी नागपूर महानगरपालिका आस्थापनेवर वर्ग-४ संवर्गातील सफाई मजदूर मेहतर/वाल्मिकी/भंगी मजदूर कर्मचारी यांना लाड समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्याबाबतची माहिती आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यापुढे सादर केली. यावेळी डॉ. चौधरी यांनी सेवानिवृत्त/स्वेच्छा सेवानिवृत्त/मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसांची निवड करण्याकरिता यादी प्रसिद्ध करण्यात यावी, सदर यादी प्रसिध्द करून आक्षेप मागविण्यात यावे, संबंधित अर्जदारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी असे निर्देश दिले.
