मुंबई, दि. मुंबई/रायगड: मुंबईसह सबंध कोकण पट्ट्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. मध्यरात्री पासून कोसळणार्या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यामुळे मुंबईकरांची सकाळ काहीशी विस्कळीत झाली. सोबतीला उपनगरी रेल्वे मार्ग बाधित झाल्यामुळे सकाळी-सकाळी कार्यालयात जाणार्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुख्यतः मध्य व हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतून काही काळ पूर्ण ठप्प झाली होती.
मुळसाधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व शाळा व कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या प्रमुख नद्यांसोबत छोट्या-मोठ्या जवळपास सर्व नद्या दुथडीभरून वाहत आहेत. सततच्या पावसामुळे महाड येथील सावित्री नदीची पातळी वाढल्यामुळे महाड बाजारपेठेत पाणी शिरले आहे. येथील दुकानातील मालाची हलवाहलव व्यापार्यांनी सुरू केली असून पुढील २४ तास आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्यामुळे नदीकिनारील नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. उरण तालुक्यातील चिरनेरमध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त घरं पाण्याखाली गेली. रसायनी पोलीस स्टेशन पाण्याखाली गेलं. आपटा गावातही अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. अलिबाग रेवदंडा मार्गावर आक्षी इथं आणि अलिबाग पोयनाड मार्गावर पळी इथं रस्त्यावर झाड, विजेच्या तारा पडल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असून अलिबागचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे नागोठणे शहरात पाणी शिरलं असून प्रमुख तिन्ही रस्ते बंद झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुळसाधार पाऊस पडतोय. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक बंद झाली आहे. वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चिपळूण बाजारपेठेत ही पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून स्थानिक आमदार शेखर निकम यांनी तात्काळ उपाययोजना करण्यासंबंधी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. २०२१ सालासारखी पुरस्थिती निर्माण होते की काय अशी सध्याची तेथील परिस्थिति असल्याचे ते म्हणाले.
ठाणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने चांगलीच संततधार धरली आहे. आजही पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळं भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, कल्याण, डोंबिवली, मुरबाड आणि उल्हासनगर या सर्वच तालुक्यांसह उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे. ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या रेल्वे मार्गावर पाणी आल्यामुळं रेल्वे वाहतूकही काहीशा संथ गतीनं सुरु होती. लांब पल्ल्याची रेल्वे वाहतूक पनवेलमार्गे वळवण्यात आली असून मुंबई-पुणे दरम्यानच्या इंटरसिटी, सिंहगड, डेक्कन, इंद्रायणी या चार गाड्या रद्द केल्या आहेत. बदलापूरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाल्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बदलापूर बॅरेज येथे उल्हास नदीने इशारा पाण्याची पातळी ओलांडली असून, नदीने धोक्याची पातळी पार केल्यास जीवन प्राधिकरणाचं जलशुद्धीकरण केंद्र कधीही बंद केलं जाईल. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहराचा पाणीपुरवठा बंद होणार असल्यानं नागरिकांनी पाणी साठा करून ठेवावा तसंच पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. सुमारे अडीचशे कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. अंबरनाथच्या वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात १२४ च्या सरासरीने ९९८ मिमी पावसाची नोंद झाली असून नदी-नाल्यांची पाणी पातळी वाढली आहे. सखल पुलांवर पाणी वाढलं आहे. पुढील दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. नवी मुंबई हार्बर मार्गावरील लोकल सेवा पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहेत. पनवेल ते सीएसएमटी या मार्गावर सकाळी नऊ ते अकरा या वेळात ९ लोकल तर सीएसएमटी ते पनवेल या मार्गावर ४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत असून कयाधू नदीला पूर आला आहे. हिंगोली शहरात सैलानीबाबा चौकात एक घर कोसळून एक महिला जखमी झाली. कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला असून पंचगंगा नदीच्या पाणीपतळीतही वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी ओढे नाल्यांना पूर आला असून झाडे उन्मळून पडली आहेत. राधानगरी तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू असून पावसाची एकूण परिस्थिती बघता पर्यटकांनी सहली टाळाव्यात असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात कोयनानगर परिसरात पाणी पातळीत वाढ झाल्यानं काडोली ते संगमनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात काल पासून संततधार पाऊस सुरु असून या पावसानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर येऊन शेत जमीन पाण्याखाली गेली आहे. मंगळवारी रात्री पासून वाशीम, मंगरूळपीर आणि इतर ठिकाणी दमदार पाऊस झाला. काल रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातल्या वनोजा इथल्या लेंडी नाल्याला पूर आल्यानं वनोजा गाव आणि तांडा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वनोजा ते पिंजर मार्गाचा संपर्क तुटला होता. राज्यात अतिवृष्टीने काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवल्यान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी संबंधित जिल्ह्याधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. बाधित जनतेच्या पाठीशी सरकार उभं आहे अशी ग्वाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळं ‘एनडीआरएफ’ अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या एकूण १२ तुकड्या राज्यात तैनात आहेत. यातल्या ५ तुकड्या मुंबईत आणि प्रत्येकी एक तुकडी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि नागपूरमध्ये तैनात आहेत.
देशाच्या बहुतांश भागात पाऊस पडत असून पुढचे २ ते ४ दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, तेलंगण, आणि ओदिशात आज दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राजस्थान, जम्मू- काश्मीर, लडाख, गिलगिट, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, केरळ आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातही जोरदार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरक्षेत्रात चक्रीवादळ तयार होत असून त्यामुळे पुढच्या चोवीस तासात पश्चिम बंगाल आणि ओदिशावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता राहील असं अंदाजात म्हटलं आहे.