कोणतेही घर, कोणतीही आस्थापना ही तिरंग्याविना राहू नये यासाठी नागरिकांनी, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा : कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे
कोल्हापूर, दि. १० : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले आहे. हे अभियान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरो कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित मल्टिमीडिया व्हॅन प्रसिद्धी अभियानाला आज पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत केंद्रीय संचार ब्युरोचे कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालय, केंद्र सरकारची धोरणे आणि योजनांचा प्रचार करण्याचे काम करते. घरोघरी तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी भारत सरकारकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने कार्यालयातर्फे चित्ररथ तयार करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना बलकवडे यांनी कोणतेही घर, कोणतीही आस्थापना ही तिरंग्याविना राहू नये यासाठी नागरिकांनी, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आणि हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी सरकारी यंत्रणेला सहकार्य करण्याची विनंती केली. कोविडचे प्रमाण कमी झाल्यामुळे लसीकरणाला नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळतो आहे. परंतु कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची तीव्रता कमी आढळते. केंद्र सरकारच्या वतीने निशुल्क उपलब्ध असलेली कोविडची खबरदारीची मात्रा घेण्याचे देखील यावेळी त्यांनी आवाहन केले.
हा चित्ररथ कोल्हापूर शहर, कागल, गडहिंग्लज, आजरा, गारगोटी या तालुक्यात फिरणार आहे. हा चित्ररथ लोकांना तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करेल तसेच तिरंग्याचा आदर ठेवण्याविषयीची माहिती सामायिक करेल. या कार्यक्रमास केंद्रीय संचार ब्युरोचे कर्मचारी उपस्थित होते.
