कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा
राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी
नागपुरात पाऊस सुरू असून गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारलेली होती. ज्यामुळे उकाड्यात वाढ झालेली होती. पावसाच्या प्रतीक्षेत शहरवासी होते. आज दुपार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागपूरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. वर्धा शहरात मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. नाशिक मध्ये ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात केवळ १७ पूर्णांक ७९ शतांश टक्के पाणीसाठा आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा, सद्यस्थितील पर्जन्यमान याबाबी विचारात घेऊन महापालिकेने दैनंदिन पाणीवापर अत्यंत काटकसरीने करावा. त्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात पाणी कपात करावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाने महापालिका प्रशासनाला केली आहे. त्यामुळे मागील अडीच वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात आहे.
