स्थानिय लोकाधिकार समितीला मोठं भगदाड पडण्याची शक्यता
मुंबई, दि. ११: शिवसेना नेते व स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष खा. गजानन कीर्तिकर यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. ते शिंदे गटात प्रवेश करणारे १३ वे खासदार ठरले आहेत. दरम्यान च्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांच्या आजारपणात विचारपूस करण्यासाठी त्यांची राहत्या घरी भेट घेतली तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. खा. कीर्तिकरांच्या आजच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच उभा राहिला आहे. या क्षणाला शिवसेना प्रणित स्थानिय लोकाधिकार समितीत उभी फूट पडण्याची शक्यता जास्त आहे. कारण खा. गजानन कीर्तिकर यांनी या संघटनेत आपली पाळंमूळं खोलवर रुजवली आहेत. मुंबईसह देशभरातील प्रमुख सरकारी बँका, मोठी सरकारी तसेच खाजगी आस्थापनं आदि ठिकाणी स्थानिय लोकाधिकार समितीचे अस्तित्व ठळकपणे दृष्टीस पडते. या ठिकाणी जर शिंदे गटाने दावेबाजी केली तर मोठे तंटे ही पाहण्यास मिळू शकतात.
खा. गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तिय मानले जातात. युवासेनेच्या स्थापनेपासून त्यांच्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी असून काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. वडील शिंदे गटात गेल्यावर पुत्र म्हणून अमोल कीर्तिकर त्यांच्या मागे शिंदे गटात जातात का असा प्रश्न उपस्थित होत होता. परंतु, अमोल कीर्तिकार यांनी आपण ठाकरे गटात जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी आपली प्रतिक्रिया कळवली.
