स्फोटात एका महिलेचा मृत्यू, तर ४५ जण जखमी
कोची, दि. 29: केरळातील कोची येथे कळमसेरी परिसरात आज सकाळी झालेल्या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला तर ४५ जण जखमी झाले. जेहोवा ख्रिस्ती समाजाची प्रार्थना सभा सुरु असताना हा स्फोट झाला. सुमारे दोन हजार जण या सभेसाठी जमले होते. स्फोटानंतर सभास्थळी पसरलेली आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांमधे दाखल केलं असून ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. सध्या केरळ पोलीस व एनआयए या घटनेचा तपास करत आहेत.
दरम्यान जेहोवा पंथाच्या एका अनुयायानं स्फोटाचा सूत्रधार असल्याची कबुली दिली असून स्वतःला त्रिशूर पोलिसांच्या हवाली केलं आहे. पोलीस तपास सुरु असल्याचं सहाय्यक पोलीस महासंचालक एम. आर. अजित कुमार यांनी सांगितलं. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकानंही घटनास्थळी भेट दिली. मुख्यमंत्री पिनराई विजयन दिल्ली दौऱ्यावर होते ते दौरा गुंडाळून केरळला परत आले आहेत. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर उद्या त्यांनी राजधानी तिरुवअनंतपुरम इथं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विजयन यांच्याशी बोलून या घटनेची माहिती घेतली. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु करावा अशा सूचना त्यांनी दिल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.
