प्लास्टिकमुक्त शहरासाठी स्वातंत्र्यदिनी संकल्प करण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन
नवी मुंबई, दि. १५: स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणशील शहर अशी नवी मुंबईची ओळख असून त्यादृष्टीने राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचा उत्तम सहभाग मिळत असून हाच उत्साह कायम राखत प्लास्टिकमुक्त मार्केट, प्लास्टिकमुक्त सोसायटी, प्लास्टिकमुक्त शाळा करण्याचा संकल्प आजच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त करून निसर्गाची आणि पर्यावरणाची हानी करणा-या एकल वापर प्लास्टिकला दैनंदिन जीवनातून दूर करूया असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले. ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये आयोजित विशेष समारंभप्रसंगी आयुक्तांच्या हस्ते तिरंगा ट्रिब्युट उपक्रमांतर्गत शहीद जवानांच्या कुटुंबियांचा तसेच 1971 च्या युध्दात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देशभक्तीपर सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार व्यासपीठावर उपस्थित होते.
नवी मुंबई शहर थोड्याशा प्रमाणातही अस्वच्छ होऊ नये यादृष्टीने नागरिकांनी सजग व्हावे व अस्वच्छ करणा-यांना त्यापासून तिथल्या तिथे रोखावे ही संकल्पना नजरेसमोर ठेवून ‘टोक दो’ हे नाविन्यपूर्ण अभियान आजच्या स्वातंत्र्यदिनापासून सुरू होत असल्याचे आयुक्त महोदयांनी जाहीर केले. या अभियानाविषयीच्या माहितीपूर्ण ध्वनीचित्रफितीचे यावेळी अनावरण करण्यात आले तसेच आरंभ क्रिएशन्सच्या कलावंत समुहाने ‘टोक दो’ अभियानावरील प्रहसन सादर करीत मनोरंजनातून प्रबोधन केले. यावेळी नवी मुंबईतील वैशिष्ट्यांची ओळख करून देणा-या ‘इन्फिनिटी कॅनव्हास’ या विशेष चित्रफितीचेही अनावरण आयुक्त महोदयांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मागील 3 महिन्यांमध्ये लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांवरील ध्वनीचित्रफित प्रदर्शित करण्यात आली. त्या माध्यमातून उपक्रमांतील वैविध्य आणि व्यापकता निदर्शनास आली.
यावेळी मनोगतात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभाग कार्यालय स्तरावर स्वच्छतेची निकोप स्पर्धा व्हावी व यातून नवी मुंबई शहर स्वच्छता अधिक प्रभावीपणे व्हावी यादृष्टीने स्वच्छ मंथन स्पर्धेचे पाचवे पर्व सुरू होत असल्याचे सांगितले. तसेच शहर स्वच्छतेकडे अधिक बारकाईने लक्ष देणारी अँटी डेब्रिज व अँटी गार्बेज विशेष पथके आजपासून कार्यान्वित होत असल्याचे जाहीर केले. स्वच्छता मॉनिटरींग ॲप लवकरच कार्यान्वित होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांवर लहान वयापासूनच स्वच्छतेचे संस्कार व्हावेत याकरिता आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मतदान, कागदी आकाशकंदील निर्मिती, स्वच्छता दिंडी, स्वच्छता बुध्दीबळ अशा अभिनव उपक्रमांची माहिती देत यापुढील काळात विद्यार्थ्यांना घनकच-यावरील संपूर्ण प्रक्रिया समजावी यादृष्टीने विशेष अभ्यास सहली आयोजित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. कचराकुंडीमुक्त शहर, कापडी कचरा पुनर्वापरासाठीचा करार, स्मार्ट शौचालय, मासिक वार्तापत्र अशा विविध नवीन बाबींवर त्यांनी माहिती दिली.
स्वच्छतेप्रमाणेच आरोग्य, शिक्षण, लोककल्याणकारी योजना, पाणीपुरवठा, विविध प्रकल्प व सुविधा, पर्यावरण संरक्षण – संवर्धनासाठी नियमावली, वृक्षसंपदा व उद्याने, सीसीटिव्हीद्वारे शहर सुरक्षा, लिडार तंत्रज्ञानाव्दारे मालमत्ता सर्वेक्षण तसेच प्रगतीपथावरील व आगामी संकल्पित कामे याविषयी आयुक्तांनी सविस्तर माहिती दिली.
नागरिकांना गतीमान सेवा मिळावी व प्रशासकीय कामकाजात सुलभता व पारदर्शकता यावी यादृष्टीने डिजीटलायझेशनकडे वाटचाल करीत ई ऑफिस, तक्रार निवारण प्रणाली, संकेतस्थळ, विविध सेवांची ऑनलाईन उपलब्धता अशा कार्यप्रणाली लवकरच सुरू करण्यात येत असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या ‘झिरो प्लास्टिक स्टार्ट विथ मी’ या उपक्रमात पहिल्या 3 क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी करणारे विद्यार्थी अनुक्रमे तानिया खातुन फरीद मल्लिक (नमुंमपा शाळा क्र. 18 सानपाडा), विघ्नेश नागेश खोत (नमुंमपा शाळा क्र. 10 नेरूळ) व सागर देवजी चव्हाण (नमुंमपा शाळा क्र. 117 दिवाळे) या 3 विद्यार्थ्यांना आयुक्त महोदयांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 6 महिन्यांसाठी कामाचे प्रशिक्षण घेण्यासाठी निवड झालेल्या प्रातिनिधिक 10 युवक, युवतींना यावेळी योजना रुजू आदेश प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे दैनंदिन शहर स्वच्छतेत योगदान देणा-या बेलापूर ते दिघा अशा प्रत्येक विभागातील व मुख्यालयातील स्वच्छताकर्मींचा आयुक्त महोदयांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित सांस्कृतिक उपक्रमांत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 101, शिरवणे येथील विद्यार्थी समुहाने देशभक्तीपर दिमाखदार नृत्याविष्कार सादर केला. स्वच्छता दिंडी स्पर्धेतील विजेत्या छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा शाळा क्र. 104 आंबेडकर नगर, रबाळे यांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडवितानाच ‘निश्चय केला, नंबर पहिला’चा उद्घोष करीत स्वच्छतेचा संदेश प्रसारित केला.
घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत आयोजित तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, इकोफ्रेंडली तिरंगा सायकल रॅली, बाईक रॅली अशा विविध उपक्रमांत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याबद्दल तसेच 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपले घर, कार्यालये, आस्थापना यावर तिरंगा झेंडा फडकवून अभियान यशस्वी केल्याबद्दल आयुक्तांनी नागरिकांचे आभार व्यक्त केले.
देशभक्तीने भारलेल्या वातावरणात महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. शहीदांच्या पत्नींचा सन्मान आयुक्तांनी मंचावरून उतरून त्यांच्या आसनापर्यंत जाऊन केला, उपस्थित सर्वांनी जागेवर उभे राहून त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला.
