राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक मुंबई येथे झाली संपन्न
मुंबई, दि. १७: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक मुंबई येथे संपन्न झाल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बैठकीत झालेल्या चर्चेची तपशीलवार माहिती त्यांनी दिली. यापुढे ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या उपक्रमावर अधिक भर देण्यात येईल तसेच बूथ कमिट्या अधिक सक्षम करण्यासाठी विभागीय स्तरावर काही नेत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून या कमिट्या मजबूत करण्यात येतील. तसेच पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रीयाही सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदा ३४९ वर्षे पूर्ण होत असताना हा सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभर साजरा करण्यात येणार आहे. तसेच १० जून रोजी पक्ष २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यासाठी अहमदनगर येथे भव्य सभा घेण्याचा निर्णय बैठकीत झाल्याची माहितीही प्रदेशाध्यक्षांनी दिली.
