आज सकाळी एका सभेत त्यांच्यावर करण्यात आला होता गोळीबार
जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांचं निधन झालं. क्योटो जवळच्या नारा शहरात आज सकाळी एका निवडणूक सभेत त्यांच्यावर गोळीबार झाला. घटनेनंतर त्यांना तात्काळ इस्पितळात दाखल करण्यात आले होते. परंतु, यानंतर अवघ्या दोन तासात त्यांचा मृत्यू झाल्याचं जपानच्या सरकारी वृत्त वाहिनीनं जाहीर केलं आहे. शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध करण्यात आला आहे. त्यांच्या निधनाबद्दल भारतात उद्या एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनामुळे झालेलं दुःख शब्दातीत आहे. ते उत्कृष्ट नेते होते आणि चांगले प्रशासक होते. जपानसह संपूर्ण जगाला उत्कृष्ट बनविण्याच्या प्रयत्नात त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. आबे यांच्या मृत्यूमुळं भारताने एक चांगला मित्र गमावला असल्याची प्रतिक्रिया संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे तीव्र दुःख झाल्याचं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.
