जम्मू हवाई दलाच्या तळावर ड्रोन द्वारे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताचं संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानबाबत मोठं वक्तव्य
दहशवादी कारवायांसाठी ड्रोनचा वापर होण हे संपूर्ण जगाच्या सुरक्षिततेच्या अतिशय धोकादायक आहे असं मत केंद्रीय विशेष गृहसचिव व्ही. एस. के. कौमुदी यांनी आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने आयोजित दहशदवाद विरोधीसुरक्षा यंत्रणाच्या प्रमुखांच्या दुसऱ्या जागतिक उच्च स्तरीय परिषदेत मांडलं. मुख्यतः नुकत्याच जम्मू हवाई दलाच्या तळावर ड्रोन द्वारे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने हा मुद्दा जागतिक स्तरावर मांडल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
दहशतवादाला संपूर्णतः नष्ट करण्यासाठी, पाकिस्तानने आपल्या नियंत्रणाखालील भूभागावरील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी आणि या कारवायांविरोधात प्रभावी उपाय योजना करावी यासाठी जागतिक दबाव वाढवण्याची गरज आहे असं स्पष्ट आणि आग्रही मतही व्ही. एस. के. कौमुदी यांनी यावेळी मांडलं. ड्रोन सारख्या अतिशय स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या हवाई स्तरावरील माध्यामतून, अतिरेक्यांना माहिती गोळा करणं, स्फोटके पाठवणं आणि हल्ले करणं या सारख्या कारवाया करणं सुलभ झालं आहे, हत्यारेवाहक ड्रोनचा वापर ही अतिरेक्यांकडून होऊ शकतो, हे सर्व जागतिक सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने अधिक आव्हानत्मक आहे आणि त्याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचं मत ही कौमुदी यांनी यावेळी व्यक्त केलं.
