एनडीआरएफ च्या पथकाकडून बचावकार्य जोरात चालू
खालापूर, दि. २०: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीत काल रात्री उशिरा दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू असून आतापर्यंत जवळपास ७० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शालवाडी आदिवासी गावात ५५० मीटर उंच डोंगराचा भाग कोसळून सहा गावकरी आणि बचाव पथकातील एक सदस्य ठार झाला. आणि आतापर्यंत सुमारे १० लोकांना चिखल आणि दगडांमधून वाचवण्यात यश आले आहे, तर आणखी ८० लोक अजूनही अडकल्याची भीती आहे. त्यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ११.४५ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलिस, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू केले. अपघाताचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्रात तैनात आहेत.
गुरुवारी सकाळी शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि धोकादायक भागात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तेथे क्रेन व अवजड यंत्रसामग्री बचाव कार्यासाठी नेणे शक्य नसल्याचे सांगितले. बचावकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, हेलिकॉप्टर मोहिमेसाठी सज्ज आहेत, परंतु वादळी हवामानामुळे ते परिसरात उतरू शकणार नाहीत.
गेले दोन दिवस रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरड कोसळण्याची दुर्घटना घडलेला परिसर हा मोरबे धरण क्षेत्राजवळ असून येथे दर वर्षी अतिवृष्टी होत असते या परिसरात अनेक गडकिल्ले असून दुर्गभ्रमंती करणार्यांचा व पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात राबता असतो. येत्या काळात शासनाला या परिसरातील धोकादायक व दरडप्रवण क्षेत्राचा आढावा घ्यावा लागणार आहे.
