इंडियन ऑईल टॅंकिंग (IOTL) व्यवस्थापना बरोबर रायगड कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांची कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा
उरण, दि. ५(विठ्ठल ममताबादे): रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी बुधवार दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वा. IOTLच्या व्यवस्थापना बरोबर धुतुम गावातील प्रकल्पग्रस्त कामगारांच्या पगारामध्ये असलेल्या तफावती संदर्भात कंपनीचे व्यवस्थापन व कंत्राटदार यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी पगाराची तफावत तातडीने कमी करा असे त्यांनी व्यवस्थापनास सांगितले. शेवटी सर्व प्रकल्पग्रस्तांनी कंपनीसाठी जमीन दिलेल्या आहेत, तरी त्यांच्या पगारासाठी वेगवेगळा न्याय देता येणार नाही. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर या कंपनीचे वैभव उभे आहे. त्यांच्यावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. असा सज्जड इशारा कामगार नेते महेंद्र घरत यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे. तसेच धुतुम ग्रामपंचायत मधील नागरी सुविधांसाठी कंपनीने आपल्या CSR फंडाचा मुबलक प्रमाणात वापर करावा असेही सांगितले. यावेळी धुतुम ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्ष शंकर ठाकूर,प्रेमनाथ ठाकूर, कामगार वर्ग तसेच कंपनी व्यवस्थापना तर्फे भुपेश शर्मा, मिलिंद मोघे, संदिप काळे आदि उपस्थित होते.
