डिसेंबर महिन्याच्या ५.७२ टक्क्यांवरून जानेवारी महिन्यात ६.५२ टक्के वाढ
मुंबई, दि. १३: देशातील जनतेवर पुन्हा एकदा महागाईचा बोजा वाढला आहे. जानेवारी २०२३ मध्ये किरकोळ महागाईचा दर पुन्हा एकदा साडेसहा टक्क्यांच्या पुढे गेला आहे. जानेवारी २०२३ मध्ये, किरकोळ महागाई दर ६.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर डिसेंबर २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ५.७२ टक्के होता. जानेवारी २०२२ मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ६.०१ टक्के होता.
किरकोळ महागाई वाढण्याची कारणे पाहिल्यास, जानेवारीमध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर ५.९४ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो डिसेंबर २०२२ मध्ये ४.१९ टक्के होता. म्हणजे जानेवारीत खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. जानेवारी २०२२ मध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर ५.४३ टक्के होता. जानेवारी २०२३ मध्ये दुधाचा परिणाम किरकोळ महागाई दरावर दिसून येत आहे. दूध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांचा महागाई दर ८.७९ टक्के आहे. मसालेही महागले आहेत आणि हाच महागाई दर २१.०९ टक्के आहे. तृणधान्ये आणि उत्पादनांचा महागाई दर १६.१२ टक्के आहे. मांस आणि माशांच्या महागाईचा दर ६.०४ टक्के आहे, तर अंडी ८.७८ टक्के आहे. पालेभाज्या आणि भाज्यांचा महागाई दर नकारात्मक असून तो -११.७० टक्के आहे. फळांचा भाव २.९३ टक्के होता. डाळींच्या महागाईचा दर ४.२७ टक्के आहे.
