अपत्यप्राप्ती बाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केली दिलगिरी
गेल्या आठवड्यात ह.भ.प. इंदोरीकर महाराजांनी अपत्य प्राप्तीसंदर्भात नाशिक येथे एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर मोठा वादंग निर्माण झाला. सोशल मीडियावरही उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. या सर्व वादावर पडदा टाकत आज इंदोरीकर महाराजांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलगिरी व्यक्त केली.
या पत्रकात इंदोरीकरांनी काय लिहिलं?
महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील व मातासमान असलेला तमाम महिला वर्ग. आज गत आठ दिवसांपासून माझ्या कीर्तनरुपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.
तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटना, अंधश्रद्धा निर्मूलन व विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो व माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे ही सदिच्छा.