रेल्वेला आरक्षित प्रवासी सेवेतून मिळणाऱ्या महसुली उत्पन्नात ५०% टक्क्याची तर अनारक्षित प्रवासी सेवेतून मिळणाऱ्या महसुली उत्पन्नात ४२२% टक्क्याची वाढ
नवी दिल्ली, दि. २: एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत भारतीय रेल्वेचं एकूण अंदाजीत उत्पन्न ४३,३२४ कोटी रुपये होतं, मागच्या वर्षीच्या याच कालावधीतल्या २४,६३१ कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत यात ७६ टक्क्याने वाढ झाली आहे.
आरक्षित प्रवासी विभागात, १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सुमारे ५,३६५ लाख प्रवाशांनी आरक्षण सेवेचा लाभ घेतला. मागच्या वर्षी याच कालावधीत ही संख्या ४,८६० लाख इतकी होती. यंदा त्यात १०% नं वाढ झाली. १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत प्रवासी आरक्षणातून रेल्वेला मिळालेलं महसूली उत्पन्न ३४,३०३ कोटी रुपये इतकं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत प्रवासी आरक्षणातून रेल्वेला मिळालेलं महसूली उत्पन्न २२,९०४ कोटी रुपये होतं, त्यात यावर्षी ५०% इतकी वाढ झाली.
१ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सुमारे ३५,२७३ लाख इतक्या प्रवाशांनी रेल्वेच्या अनारक्षित प्रवासी सेवेचा लाभ घेतला. मागच्या वर्षी याच कालावधीत ही संख्या १३,८१३ लाख होती. यात यावर्षी तब्बल १५५% इतकी वाढ झाली. १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत रेल्वेला अनारक्षित प्रवासी सेवेतून ९,०२१ कोटी रुपयांचं महसुली उत्पन्न मिळालं. मागच्या वर्षीच्या याच कालावधीत ते १,७२८ कोटी रुपये इतकं होतं. यात यंदा ४२२% ची वाढ झाली.
