हैदराबाद बलात्कार कांडातील आरोपींचा पोलिसांकडून खात्मा, अंजली दमानिया म्हणतात “एन्काऊंटर मला मान्य नाही”
हैदराबाद: हैदराबाद बलात्कार आणि खून प्रकरणी ताब्यात असलेल्या चारही आरोपींचा आज सकाळी पोलिसांनी एन्काऊंटर केला. सदर आरोपींना तपासाचा एक भाग म्हणून घटनास्थळी नेण्यात आले होते पण या ठिकाणी नेल्यावर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना थांबण्याचं इशाराही दिला पण अखेर पोलिसांना गोळीबार करावा लागला. ज्यात या चारही आरोपींचा खात्मा झाला अशी माहिती हैदराबाद च्या पोलीस आयुक्तांनी माध्यमांना दिली.
या एन्काऊंटर नंतर देशभरातून उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत असून पीडितेच्या वडील आणि बहिणीनेही आपल्याला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. याच वेळी आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया म्हणाल्या की, “या घटनेतील आरोपींना शिक्षा झाली या बद्दल माझ्या मनाला आनंद झाला आहे पण माझ्यासारख्या जबाबदार नागरिकाला ज्या प्रकारे हे झालं ते मान्य नाही. देशाच्या न्यायसंस्थेने या साठी योग्य बिल मंजूर करावं. पोलीस एन्काऊंटर करणं मला मान्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने सर्व थकीत खटले विशेष न्यायालयाची स्थापना करून मोकळे करावेत.”
अंजली दमानिया यांच्या या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
