वा ! मुंबई पोलीस दलात अश्वदळाचा समावेश; येत्या २६ जानेवारीच्या संचलनात सहभाग- गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई: बृहन्मुंबई पोलीस दलात तब्बल ८८ वर्षांनी पुन्हा अश्वदळाचा (माऊंटेड पोलीस युनिट) समावेश करण्यात येत आहे. येत्या दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभातील संचलनात हे पथक सहभागी होणार असून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे. मुंबई पोलिसांचे ‘माऊंटेड पोलीस युनिट’ वाहतूक नियंत्रण, गर्दीच्या ठिकाणी गस्त, समुद्र किनारी चौपटीसारख्या गर्दीच्या ठिकाणी गस्त, नियंत्रणासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज व्यक्त केला.
गृहमंत्री श्री. देशमुख यांनी शिवाजी पार्क येथील अश्वदळाची पाहणी करून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, सह पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, नवल बजाज, संजय रस्तोगी, अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. जयकुमार, विरेश प्रभू, परिमंडळ उपायुक्त श्रीमती नियती ठाकर आदी उपस्थित होते.
मुंबई पोलीस दल हे उत्कृष्ट पोलीस दल असून बदलत्या काळाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब मुंबई पोलिसांनी केला आहे असे सांगून गृहमंत्री म्हणाले, यापूर्वी पोलीस दलात माउंटेड पोलीस कर्मचाऱ्यांद्वारे मुंबईच्या रस्त्यावर गस्त केली जात होती. परंतु, वाढत्या वाहनांमुळे डिसेंबर 1932 मध्ये ‘माउंटेड पोलीस युनिट’ बंद करण्यात आले. आत्ता मुंबई पोलीस दलात अत्याधुनिक वाहने, वेगवान मोटारबाईक्स आहेत. मात्र, गर्दीच्या ठिकाणी गुन्हे नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक प्रभावी ठरेल या दृष्टिकोनातून ‘माऊंटेड पोलीस’ उपयुक्त ठरेल हे लक्षात आले. त्यानुसार स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अश्वदळाचा मुंबई पोलीस दलात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन जाणे कठीण आहे अशा ठिकाणी गतीने जाऊन परिस्थितीवर नियंत्रण आणणे या पथकामुळे शक्य होईल.
पुढे ते म्हणाले, मुंबईतील वाढलेली रहदारी पाहता माऊंटेड पथकाद्वारे सण- महोत्सवाच्या दरम्यान, मोर्चे आदी प्रसंगी पादचाऱ्यांच्या गर्दीत घुसून परिस्थितीवर लक्ष व नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. गर्दीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून होणारी अरेरावी, चोरी आदींवर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी ठरेल. ‘रायडर’ घोड्यावर स्वार असल्यामुळे उंचावरून गर्दीवर लक्ष ठेवून काही चुकीचे घडत असल्यास तेथे गतीने जाता येईल. पायी चालणाऱ्या ३० पोलिसांइतकी प्रभावी कामगिरी एक अश्वस्वार पोलीस करू शकेल असे सांगून, आवश्यकता पडल्यास पुणे, नागपूर आदी शहरातही ‘हॉर्स माऊंटेड युनिट’ सुरू करण्याचा विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
