राजकारणी राहिले बाजूला, नागपूर हिंसाचारात पोलिस झाले लक्ष्य
नागपूर, दि. १८: काल दि. १७ मार्च रोजी नागपूर मधील चिटणीस पार्क, महाल परिसरात दोन गटांमध्ये दगडफेकीची घटना घडली व एकाएकी हिंसाचार उफाळून आला. यावेळी जमावाने मोठ्या प्रमाणात जाळपोळ करत रस्त्यावरील अनेक वाहनांची तोडफोड केली तर काहींना पेटवून दिलं. दंगलखोरांच्या दगडफेकीची झळ सामान्य नागरिकांसह पोलिसांनाही बसली. नागपूर पोलीस दलातील उपायुक्त दर्जाचे काही अधिकारी या हिंसाचारात गंभीर जखमी झाले.
औरंगजेबाच्या कबरीच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे काल बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्याकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांकडून कुराणाची विटंबना केल्याची अफवा पसरली. याच संदर्भात आंदोलक निघून गेल्यानंतर काही वेळाने काही तरुण आले व त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांनी त्यांची समजूत घालून त्यांना परत पाठवले. यानंतर सायंकाळी महाल परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव एकत्र आला व त्यांनी दगडफेक करण्यास सुरवात केली. त्याचं वेळी दुसऱ्या गटानेही दगडफेक करण्यास सुरुवात केली.
सध्या नागपूर शहर व परिसरातील वातावरण तणावपूर्ण असून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत जवळपास १०० जणांची धरपकड केली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच सदर हिंसाचाराची घटना घडल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला आहे. याचसोबत मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे व भाजपच्या टी. राजा यांच्या भडकाऊ भाषणांमुळेच कालचा प्रसंग ओढावल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.
