मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस तसंच संजय सरोवर, गोसेखुर्द, मेडिगड्डा आणि इतर धरणांमधून सो़लेल्या पाण्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून, आज चौथ्या दिवशी तब्बल १७ मार्गांवरची वाहतूक बंद आहे. दरम्यान पर्लकोटा नदीच्या पुराचं पाणी भामरागड गावात शिरल्यानं तिथली अनेक दुकानं आणि घरं पाण्याखाली गेली होती. मात्र, पर्लकोटाचा पूर आज दुपारपासून ओसरु लागला आहे. आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावर वैनगंगा नदीच्या पुलावरुनही पाणी वाहू लागल्यानं परिस्थिती बिकट झाली आहे.
अकोला जिल्ह्यात प्रशासनाने नदी आणि नाल्यांच्या काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन अनेक नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे. आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे, इत्यादी गावांमधल्या हजारो ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. जिल्ह्यातले ७६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक मार्गांवरची वाहतूक ठप्प आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी, गगनबावडा ते करुळ घाट, चंदगड ते दोडामार्ग हे मार्ग बंद आहेत. चंदगड तालुक्यात कोवाडच्या जुन्या पुलाजवळून पुराचं पाणी बाजारपेठेत शिरल्यानं अनेक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पंचगंगा नदीकाठच्या गावांमधल्या नागरिकांचं स्थलांतर सुरू केलं आहे. भुदरगड, गडहिंग्लज, कागल, करवीर, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांनी पावसाची ऑगस्टपर्यंतची सरासरी ओलांडली आहे. तर कागल तालुक्यानं वार्षिक सरासरी ओलांडली आहे. भुदरगडमध्ये वार्षिक सरासरीच्या ९३ टक्के पाऊस झाला आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी उरमोडी, तारळी, कण्हेर, धोम-बलकवडी, या धरणांमधून विसर्ग सुरूच आहे. कोयना धरणात सध्या साडे ८३ TMC इतका पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणातुन दुपारी ३ वाजता २ हजार १०० क्यूसेक पाणी नदीत सोडलं जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू असून, काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. इगतपुरी भागात पडणाऱ्या पावसामुळे दारणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यातून ९ हजार ५९६ क्यूसेक, तर नांदूर- माध्यमेश्वर बंधाऱ्यातून ६ हजार ३१० क्यूसेक विसर्ग सुरु आहे. नदीकाठच्या लोकांनां सावधानतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे.
