१३ लाखांपैकी ९ लाख १७ हजार नोंदित बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य
सध्या राज्यात १ मे २०२१ पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे इमारत व इतर बांधकामे तसेच इतर कामगार वर्गाची कामे पूर्ववत सुरू झालेली नसल्याने कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदित कामगारांना दीड हजार रुपयाचा अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू होत असून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
तसेच नोंदित बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्याची मंडळाकडून योजना राबविण्यात येत असून आतापर्यंत २ लक्ष ३ हजार कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सर्वच नोंदित कामगारांची युद्धपातळीवर आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव कालावधीत मुंबई/ नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर येथे बांधकाम कामगारांना मध्यान्ह व रात्रीचे भोजन वितरित करण्यात येत आहे. त्यामुळे परप्रांतीय बांधकाम कामगारांनी स्थलांतर करू नये, असे आवाहनही कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. गेल्या वर्षीही कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भाव कालावधीत नोंदित बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली होती.
