गुजरात मधील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक भागात आज पावसाची हजेरी
महाराष्ट्राच्या अनेक भागात आज पावसानं हजेरी लावली. गुजरातमधे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिमाण म्हणून आज सकाळी सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आणि नंदूरबार जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या वादळानं अनेक भागात घरं आणि दुकांनांचं नुकसान झालं. तळोदा-अक्कलकुवा रस्त्यावर अनेक झाडं पडली. तर नंदुरबार तालुक्यात धानोरा इथल्या गोदामाचे पत्रे उडाल्यानं तिथल्या कापसाचं नुकसानं झालं.वाशिम जिल्ह्यातही आज दुपारी विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अंगावर वीज पडून दोन जणांचा मृत्यु झाला. बुलडाणा जिल्ह्यात आज दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला यात वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. खामगाव तालुक्यात एका शेतकऱ्याच्या अंगावर झाड पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर आणि नांदुरा रस्त्यावर पावसामुळे झाडं पडल्यानं काही काळ वाहतूक बंंद होती. विद्युत तारा तुटुू वीजपुरवठाही बंद पडला.सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील काही भागात वादळी वार्यासह पाऊस झाला. जिल्ह्यात वीज कोसळून एक महिला आणि एका व्यक्तीचा मृत्यु झाला. सांगोला तालुक्यात सर्वत्र वादळी वार्यात अनेक झाडे उन्मळुन पडली विजेचे खांब पडले.
जळगाव शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात आज रविवारी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे शहरात काही भागांमध्ये वृक्ष उन्मळून पडले. तर केळीसह शेतपिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. धुळे जिल्ह्यात आज मुसळधार पावसानं धुळे शहर तसेच धुळे तालुका, साक्री, शिरपूर, दोंडाईचा या भागाला झोडपून काढलं. यावेळी आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज दुपारी वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं. अनेक घरांवरचे पत्रे, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले. शेडनेट हाऊसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अंबड तालुक्यात डाळिंब आणि मोसंबी फळबागांना वादळाचा फटका बसला. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, नेवासे पाथर्डी तालुक्यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यानं जोरदार हजेरी लावली. पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथील पाथर्डी बीड राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझा खाली कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.