जुन्या ग्रामपंचायतीमधल्या सफाई कामगारांना नव्या नगर परिषदेत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय
ज्या ग्रामपंचायतींचं नगर परिषद अथवा नगर पंचायतीत रुपांतर झालं आहे, तिथल्या सफाई कर्मचाऱ्यांना, नवनिर्मित नगर परिषदा किंवा नगर पंचायतींमध्ये रिक्त जागांनुसार सामावून घेण्याचा निर्णय, नगरविकास विभागानं घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यभरातल्या १ हजार ४७७ सफाई कर्मचाऱ्यांना, या निर्णयाचा लाभ होणार आहे. मंजूर तसंच रिक्त जागांवर, विहीत शैक्षणिक तसंच तांत्रिक अर्हता प्राप्त असलेल्या इच्छुक सफाई कर्मचाऱ्यांच्या समावेशनाला, मान्यता देण्यात आली आहे. विहीत तांत्रिक अर्हता पूर्ण न करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी, महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिक प्रशिक्षण आणि संशोधन संस्था , अर्थात मित्रा या संस्थेच्या माध्यमातून, सहा महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांच्या समावेशनाला मंजुरी देण्यात येईल, असं या आदेशात म्हटलं आहे.
